
News Today प्रतिनिधी, वणी
नांदेपेरा मार्गे वणी शहरात येणाऱ्या अवैध वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक अडचणींवर उपाययोजना कराव्यात, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी वणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नांदेपेरा चौकातून शहरात येणाऱ्या अवैध ट्रक व मालवाहतूक वाहनांमुळे सायंकाळच्या वेळेत नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि पर्यावरणाचेही नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर चौकात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेर्यांचे तातडीने परीक्षण करून खालील तीन प्रमुख बाबींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
CCTV फुटेजचे बारकाईने परीक्षण करावे.
अवैध वाळू वाहनधारकांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
भविष्यात अशा प्रकारची वाहतूक अडचण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
रात्री ९च्या नंतर पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत अविध्य वाळू वाहतुकीने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.



