News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील सीसीआय कडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचे आदेश आमदार संजय देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला आज ता. २७ रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिले असून सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस मार्केट यार्डमध्ये आणण्यासाठी आवाहन केले आहे. या निर्णयाने वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआयची शासकीय कापूस खरेदी हमी भावाने सुरू झाली आहे. परंतु टोकण पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप होत होता. याबाबतची माहिती आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी मुंबई वरून घरी न येता सरळ कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली असता टोकणसाठी रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना बघून त्यांनी शेतकऱ्यांचे होत असलेले हाल बघून समितीचे सचिव झाडे, सीसीआय केंद्र प्रमुख हेमंत ठाकरे, सोयाबीन खरेदी व्यवस्थापक प्रकाश पचारे, आणि उपस्थित शेतकऱ्यांची सभागृहात बैठक घेतली.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या कापूस खरेदीसाठी असलेल्या अडचणीची संबंधितांकडून आढावा घेतला व ही चालू असलेल्या टोकण पद्धतीची अजिबात गरज नाही. ती तत्काळ बंद करावी आणि सरळ सरळ शेतकऱ्यांना मार्केट यार्ड मध्ये शेताचा ७/१२, आधार लिंक असलेले बँक पुस्तकं, आणि २०२४ – २५ चे पेरवे पत्रक सोबत घेवून कापूस बोलवण्यात यावा असे आदेश देताच सर्व शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा निर्णयाचे स्वागत गेले.
त्याच बरोबर सोयाबीनची खरेदी संथगतीने सुरू असल्याने त्यांना दररोज १०० वाहने खरेदी करण्याचे सुचवले असून आज पासून त्या पद्धतीने सुरू करण्याचे सुचवले. सोयाबीनला शासनाचा हमी भाव ४८९२ मिळत आहे. तसेच कापसाला ७५२१ मिळत असून सीसीआय व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजन काही त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मानसिक त्रास होत आहे. तरी शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता सुलभ व्यवस्थेने कापूस व सोयाबीन खरेदी करण्यात यावे अश्या सूचना आमदार संजय देरकर यांनी दिले.त्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला मानसिक त्रास कमी होणार आहे.
आ. संजय देरकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होतच समितीचे सचिव यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी झरि कु.ऊ.बा.स.चे सभापती राजीव कसावार, सुनील कातकडे, संजय निखाडे, प्रशांत पाचभाई, दिलीप भोयर, शरद ठाकरे, देवराव धांडे, सुधीर थेरे माजी सभापती संतोष कुचनकर, प्रवीण खानझोडे, सतीश वऱ्हाटे, घनश्याम पावडे, अजय कवरासे, मंगेश पचाभाईयांचेसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.