तारेंद्र बोर्डे दिल्लीत, विजय चोरडिया मुंबईत ठान मांडून तर आ. बोदकुरवार नैराश्यात घरीच
News Today
दिलीप भोयर
वणी :- भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे येथील वादग्रस्त शासकीय कंत्राटदार नितीन उंबरकर यांचेसोबत भूखंड खरेदी विक्री व्यवहार उघड झाल्यापासून स्थानिक भाजप नेत्यांमध्ये उभी फूट दिसून येत आहे. आ. बोदकुरवार यांची उमेदवारी धोक्यात आल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांना उमेदवारीचा ज्वर चढलं आहे. माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे उमेदवारी मिळण्यासाठी दिल्ली वारी करून आले. तर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया हे मुंबईत आपले बस्तान बांधून असल्याची माहिती आहे. शिवाय विजय पिदूरकर , रवी बेलूरकर, हे देखील आपापल्या परीने उमेदवारी खेचून आणण्याच्या जोरदार प्रयत्नात दिसून येत आहे. अश्या राजकीय तापलेल्या वातावरणात इतरांची जुळवा जुळवी सुरू असताना आ. बोदकुरवार हे नैराश्यात आले असून घरीच मुक्काम ठोकून असल्याची माहिती आहे. उमेदवारीसाठी वाढत्या रस्सीखेच मुळे खोके संस्कृती घडण्याची शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या असून येत्या २२ ऑक्टोंबर पासून नाम निर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यातच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच चालू असताना वणी विधानसभेचे विद्यमान संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी रद्द होण्यासाठी आमदार महोदयांनी केलेल्या अनेक पराक्रमाची गुरुकिल्ली पक्षश्रेष्ठींच्या टेबलवर जावून आहे.यात वणी विभागातील रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करणारे कंत्राटदार नितीन (मनू) उंबरकर यांचे सोबत असलेले हित संबंधाचे पुरावे, तसेच शहरातील कुख्यात वरली मटका संचालकाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला जावून फित कापणे, असे अनेक प्रकरणं आमदाराच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पार्टीत एक संघ प्रणित गट असून दुसरा असंघ प्रिय गट आहे. संघप्रिय गट हा देखील हळूहळू उघडपणे आ. बोदकुरवार यांच्या व्यवहरासंबधी वरिष्ठ पातळीवर विरोध दर्शवत असून असंघ प्रिय गट हा देखील भाऊ आणि भैय्याच्या गटातटात विखुरला आहे. यातील भैय्यागट हा प्रामाणिक पक्षाची धुरा खांद्यावर घेवून उमेदवार बदलण्यासाठी परिश्रम घेत आहे. तर भाऊ गट देखील नाराजीचा सुर उमटवत आहे. त्यामुळे संघाच्या भूमिकेवर पक्षाची शिस्त आहे.
आ. बोदकुरवार यांचे “राज” बाहेर पडल्याने स्थानिक कार्यकर्ते व पुढारी नाराज असल्याने वरिष्ठ पातळीवर उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपतील अनेक इच्छुक उमेदवार आपली शक्ती पणाला लावत आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिल्लीत तर विजय चोरडिया मुंबईत आपले ठाण मांडून बसले असले तरी इतर इच्छुक मंडळी नागपूरच्या वाऱ्या करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उमेदवारीची रस्सी खेच वाढल्याने ज्यांचे जास्त खोके त्यांना उमेदवारी ओके
पक्षांतर्गत सुरू असलेल्या विद्यमान उमेदवारीचा विरोध वाढत जात असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ज्यांचे जास्त खोके त्यांची उमेदवारी ओके असल्याची गोपनीय चर्चा बाहेर येत आहे. आपल्याच मामाला उमेदवारी मिळविण्यासाठी हवे तेवढे खोके कंत्राटदार भाचा बाजारातून जमा करून देण्याची जबाबदारी घेत असल्याची चर्चा आहे. खोके देवून ओके करायचे आणि बोके मतदारांच्या मानगुटीवर बसवायचे धंदे जोरात दिसत आहे.