


News Today
वणी, प्रतिनिधी –
शेतकऱ्यांच्या दुःखावर फसव्या आश्वासनांचा मलमपट्टीचा प्रयत्न करणाऱ्या भाजप शासनाविरुद्ध वणीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काळी दिवाळी आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर भररस्त्यावर आमदार संजय देरकरांनी कार्यकर्त्यांसह चटणी-भाकर खाऊन शेतकऱ्यांच्या वेदनांना साद दिली आणि शासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी आणि मारेगाव तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, दिवाळीचे दिवस उंबरठ्यावर आले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैशांचा एकही थेंब पडला नाही.

यामुळे संतप्त शेतकरीवर्ग शासनाविषयी प्रचंड नाराज आहे.त्याच पार्श्वभूमीवर वणीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन उभारले गेले. काळे कपडे परिधान करून काळी दिवाळी साजरी करत कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या”, “हैक्टरी ५० हजार अनुदान द्या”, आणि “फसवे शासन हद्दपार करा” अशा जोरदार घोषणा दिल्या. शासन निर्णयांच्या प्रती जाळून आंदोलनकर्त्यांनी अन्यायाचा दिवा पेटवत शासनाच्या धोरणांचा विरोध केला.

आमदार संजय देरकर यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय निखाडे, उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, शरद ठाकरे, सुनील कातकडे, सुधीर थेरे, गणपत लेडांगे, संतोष कुचनकर, प्रकाश कराड, दिलीप काकडे, प्रमोद भगत, भगवान मोहिते, प्रेमानंद धानोरकर, कुंदन टोंगे, आणि अनेक पदाधिकारी व शिवसैनिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत “सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपये अनुदानाची तातडीने अंमलबजावणी व्हावी,” अशी मागणी आमदार देरकर यांनी केली. त्यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, “शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ही केवळ धूळफेक आहे; या खोट्या घोषणांनी दिवाळीचे दिवे विझवले आहेत.
”या काळ्या दिवाळी आंदोलनाने वणी परिसरात एक संवेदनशील वातावरण निर्माण केले आहे. दिवाळीच्या प्रकाशातही असमानतेचा अंधार अधोरेखित करत शिवसैनिकांनी पेटवलेला “अन्यायाचा दिवा” आज शेतकऱ्यांच्या संघर्षाचे प्रतीक ठरला आहे.



