वणी :- तालुक्यातील नेरड पू. आज ता. २२ रोजी शुक्रवार शेतकऱ्यांच्या मित्र असलेल्या बैलांचा सन पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बांधवांमध्ये बैल सजविण्याची लगबग सुरू होती. बैलांना आंघोळ घालून रंगीत झगमगत्या सजावटीचे कपडे, मखमली झुल, गोंडे, घंटा व कड्या घालून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली.

संध्याकाळी गावातून सर्व बैल जोड्या गावाबाहेरील हनुमान मंदिराच्या प्रांगणात एकत्रित आल्या व नंतर मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावकरी “हर बोला हर हर हर हर महादेव” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकत होते. पदावली भजनाचा देखील सुंदर कार्यक्रम झाला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने बैलांची ओवाळणी केली.
संपूर्ण गावात या निमित्ताने आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या बैलांचा सन्मान करत पोळा सण पारंपरिक उत्साहात साजरा झाल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.



