नेताजी पारखी News Today
मुकूटबन : मुकूटबन तसेच परिसरातील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली रेल्वे गाड्यांच्या थांब्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुकूटबन रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार संजय देरकर करणार आहेत.
मुकूटबन हे परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक व प्रशासकीय केंद्र आहे. विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवासावर अवलंबून आहेत. मात्र, मुकूटबन रेल्वे स्थानकावर आवश्यक त्या प्रमुख प्रवासी गाड्यांना नियमित थांबा उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मुकूटबन रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या प्रवासी गाड्यांपैकी प्रवाशांची आवश्यकता लक्षात घेऊन महत्त्वाच्या गाड्यांना नियमित थांबा मंजूर करावा, ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. तसेच सध्या मुकूटबन येथे थांबा नसलेल्या गाड्यांचा प्रवासी भार, परिसरातील नागरिकांची गरज आणि स्थानकाचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन आवश्यक गाड्यांना तातडीने थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रश्नासंदर्भात संदर्भ क्र. नाग)सी/८३२/स. नि. दे./विधायक/वणी/२०२६, दि. २१/०४/२०२६ अन्वये संबंधित रेल्वे प्रशासनाचे यापूर्वीच लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
मुकूटबन रेल्वे स्थानकावरील प्रवासी गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून आवश्यक गाड्यांना नियमित थांबा मंजूर करावा, या मागणीसाठी दि. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रेल रोको आंदोलनात मुकूटबन तसेच परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
मुकूटबनला रेल्वे थांबा हा परिसरातील नागरिकांचा मूलभूत प्रवासी सुविधेचा प्रश्न असून, प्रशासनाने आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


