News Today
वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील दामले नगर भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दलित वस्तीत असलेल्या या शौचालयाचा वापर परिसरातील गोरगरीब नागरिक करतात, मात्र सध्या याठिकाणी स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून, संपूर्ण मानवी मलमूत्र उघड्यावर येत आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील जनजीवन त्रस्त झाले आहे. याकडे नगर परिषदेने तातडीने लक्ष देण्याची जोरदार मागणी होत आहे.
शौचालयाच्या गटार व्यवस्थेचा पूर्णत: अपकार झालेला असून, सांडपाणी थेट शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात मिसळत आहे. त्यामुळे संपूर्ण वणी शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दूषित पाण्याचा वापर केल्यास पाणीजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दामले नगर परिसरातील रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. या भागातील रहिवासी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि मुख्यत्वे कामगार, महिला, लहान मुले यांचा येथे वावर असतो. अशा अवस्थेत त्यांच्या मूलभूत स्वच्छता सुविधांकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब आहे.
नागरिकांची मागणी:
१.त्वरित शौचालयाची दुरुस्ती करावी.
२. सांडपाणी आणि मलनिःसारण यंत्रणा योग्य रितीने कार्यान्वित करावी
३. स्वच्छता अभियान अंतर्गत नियमित स्वच्छता आणि देखभाल होणे आवश्यक.
४. आरोग्य विभागाने परिसरात तपासणी करून उपाययोजना कराव्यात.
दामले नगरमधील ही परिस्थिती केवळ स्थानिक समस्या राहिलेली नसून, संपूर्ण वणी शहरासाठी ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब बनली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.