News Today
नागपूर, दि. २७ जून २०२५:
नागपूर:- सार्वजनिक बांधकाम विभागाने मे. जे. पी. इंटरप्रायजेस, मुंबई या कंत्राटदार कंपनीविरुद्ध महत्त्वपूर्ण कारवाई करत, संबंधित कंत्राटदारास एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई विभागाने १८ जून २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या आधारावर करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देत शासनाने हा निर्णय जाहीर केला आहे. कंत्राटदाराच्या कामकाजामध्ये आढळलेल्या अनियमितता, कार्यात होणारा विलंब अथवा इतर कारणास्तव ही नामुष्कीची कार्यवाही करण्यात आली आहे, असे समजते.
शासन निर्णयानुसार, कंत्राटदार मे. जे. पी. इंटरप्रायजेस, मुंबई यांना शासन पत्र निर्गमित केलेल्या दिनांकापासून पुढील एक वर्षासाठी काळ्या यादीत ठेवण्यात येणार आहे. काळ्या यादीतील असलेल्या कालावधीत या कंत्राटदारास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोणतेही नवीन कंत्राट देण्यात येणार नाही.
याबाबतचा परिपत्रक क्रमांक २७ दिनांक २० जून २०२५ रोजी नागपूर येथून निर्गमित करण्यात आला असून, तो मुख्य अभियंता, प्रादेशिक विभाग ५, नागपूर यांच्या स्वाक्षरीने प्रसारित करण्यात आला आहे. सर्व संबंधित प्रादेशिक विभाग, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली असून, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ही कारवाई इतर कंत्राटदारांसाठी देखील एक इशारा ठरणार असून, शासनाकडून अशा प्रकारच्या चुकीच्या कामकाजास सहनशीलता दाखवली जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.