News Today (प्रतिनिधी)
वणी :- तालुक्यातील हिवरधारा येथे असलेल्या D-Lite केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या चुना प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत काल (२४ जून) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास छत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका महिला कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. यातील एक महिला गंभीर जखमी आहे. कंपनी ‘सूर्या सेम’ नावाचे चुना उत्पादन तयार करते.
मृत महिलेचे नाव कु. गंगा सुगवीर कंवर (वय २०, रा. पेरीटोला, ता. राजनांदगाव, छत्तीसगड) असे असून, गंभीर जखमी महिलेचे नाव मीना आत्राम (वय ४५, रा. मोहदा, ता. वणी) आहे. उर्वरित जखमींमध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, मागील चार वर्षांत ही दुसऱ्यांदा अशा प्रकारची छत कोसळण्याची घटना आहे. या घटनेने कामगार सुरक्षेच्या बाबतीत कंपनीच्या गंभीर दुर्लक्षित धोरणांचा पर्दाफाश केला आहे. अद्याप कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही, हे विशेष.
कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना न करता, फक्त तुटपुंजी मदत देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे, अशी स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे. कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे., कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आता अत्यावश्यक बनले आहे.