News Today
झरी-जामणी (प्रतिनिधी): मुकुटबन येथील एम. पी. बिर्ला सिमेंट कंपनीत वाघाचे वास्तव समोर आले असून, त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. स्थानिक गावांतील शेकडो कामगार येथे २४ तास काम करतात. मात्र, वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे त्यांच्यावर जीवितधोका निर्माण झाला आहे.

वाघाचा वावर दिवसेंदिवस वाढतोय
संपूर्ण परिसर जंगलालगत असल्याने वन्य प्राण्यांचा वावर नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत वाघाचे दर्शन वारंवार झाल्याने चिंता वाढली आहे. कंपनीच्या आवारात वाघ फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला असून, काही कामगार व सुरक्षारक्षकांनी प्रत्यक्ष अनुभव सांगितले आहेत. रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या कामगारांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

कामगारांच्या सुरक्षेची अत्यंत दयनीय अवस्था
कामगार सांगतात की, कंपनीकडून सुरक्षा भिंती, प्रकाशयोजना किंवा वन्यप्राण्यांपासून संरक्षणात्मक उपाय यावर अजूनही काहीच ठोस पावले उचललेली नाहीत. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी असून, अनेकांनी नाईलाजास्तव ड्युटी टाळण्यास सुरुवात केली आहे.

कामगार संघटनांची मागणी
कामगार संघटनांनी तातडीने खालील मागण्या केल्या आहेत:
परिसरात वाघाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भिंती उभारणे, उच्च क्षमतेची लाईट्स बसवणे, सीसीटीव्ही अधिक सक्षम करणे.
रात्रीच्या शिफ्टसाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत.

कंपनी प्रशासन काय म्हणते.
मागील काही दिवसांपासून वाघ निदर्शनात येत आहे. त्यांचे बंदोबस्त वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कंपनीत डेरा टाकून बसले असल्याची माहिती कंपनीचे मुख्य अधिकारी ब्रीज मोहन वर्मा यांनी सांगितले आहे.

कामगारांमध्ये संताप – आंदोलनाची शक्यता
कामगारांमध्ये असंतोषाचा कडेलोट होत असून, लवकर उपाययोजना न झाल्यास कंपनीसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वाघाचा वावर फक्त कंपनीपुरता मर्यादित न राहता, आसपासच्या वसाहतींमध्येही पसरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकही असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांवरही धोका कंपनी परिसरातील शाळकरी मुले वाघाच्या भीतीमुळे शाळेत जाण्यास कचरत आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं आहे.
आधीच्या घटना दडपल्या गेल्या? काही स्थानिकांनी सांगितले की, यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या, परंतु त्या वेळेस कंपनीने व प्रशासनाने याची माहिती दडपून ठेवली.
आरोग्य व मानसिक तणावाचा मुद्दा सततच्या भीतीमुळे कामगारांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे. काहींना रात्रीची झोप लागत नाही, तर काहींना कामावर येण्याची इच्छा राहिलेली नाही

संपादकीय टिपण्णी
“मुलभूत सुरक्षा हक्क नाकारला गेला, तर विकास कितीही मोठा असला तरी तो अपूर्ण ठरतो. मुकुटबनमधील कामगार व नागरिकांनी मागणं ही केवळ संरक्षणाची नाही, तर माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराची आहे. उद्योग, वन्यजीव व मानव यांच्यात संतुलन राखण्याची जबाबदारी प्रशासनासह प्रत्येक यंत्रणेनं स्वीकारली पाहिजे.”



