
News Today
मारेगाव :- तालुक्यातील नेत वरूड परिसरात आज दिनांक १८ मे रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता अवकाळी वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी आकाशात विजांचा कडकडाट होत असताना कवडू जुमनाके यांच्या शेतात वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली.

या घटनेत भारत गेडाम यांच्या शेळीपाळीतील २२ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. शेळ्या शेताच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत चरायला सोडण्यात आल्या होत्या. त्याचवेळी वीज कोसळल्याने या निष्पाप जनावरांचा दुर्दैवी अंत झाला. यात शेळी पालक भारत जुमानाके हा देखील जखमी झाला असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही घटना अतिशय हृदयद्रावक असून मेंढपाळ भारत गेडाम यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

तालुक्यात अवकाळी वादळाचा परिणाम इतर भागांमध्येही दिसून आला असून, शेतकऱ्यांची पिकेही या पावसामुळे बाधित झाली आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शेतकरी व पशुपालकांना मदत करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.



