

News Today
वणी, ता. १३ मे तालुक्यातील पुरड – कुंड्रा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या रस्त्याच्या विकासासाठी मंजूर केलेल्या करोडो रुपयांच्या निधीचा योग्य वापर न होता, बंद सेन्सर पेव्हरचा वापर करून थेट डांबरीकरण करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

या कामासाठी उच्च प्रतीचा दर्जा राखण्याच्या सूचना असूनही कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत आहेत. सेन्सर पेव्हर वापरल्यास रस्ता समतोल, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा होतो, हे सर्वज्ञात असतानाही केवळ खर्च वाचवण्यासाठी आणि वेळ चुकवण्यासाठी ही चाल खेळली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग) चे अधिकारी मात्र या साऱ्या प्रकाराकडे डोळेझाक करत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ना तपासणी झाली, ना कारवाई. यामुळे प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील साठगाठ असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

स्थानिकांनी काम त्वरित थांबवून गुणवत्तेची चौकशी करण्याची, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या मते, “सरकारी निधीचा असा अपव्यय खपवून घेतला जाणार नाही. जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी भूमिका ग्रामस्त घेत आहे.
बघा व्हिडिओ



