News Today
वणी:- शहरासह ग्रामीण परिसरात काल तारीख ५ रोजी सुमारे ७ वाजता पासून मध्यरात्रीपर्यंत तुफान वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

सुमारे रात्री ७ वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी घरांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले. गरमीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, मोबाईल चार्जिंग, पाणीपुरवठा व इतर दैनंदिन कामांवरही परिणाम झाला आहे. काही भागांत झाडे व विजेचे खांब पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
महावितरणकडून रात्रीपासूनच काम सुरू असून, अद्यापही काही भागात वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याचे समजते. नागरिकांनी महावितरणच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या तुफानी वाऱ्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर खांब, झाडे आणि काही घरांचे पत्रे उडाल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ पंचनामे करून मदतकार्य हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



