पालकांची चिंता वाढली, मानव तस्करी करणारी टोळी सक्रीय असल्याची भीती
News Today
दिलीप भोयर
वणी:- परिसरातील अल्पवयीन व किशोरी वयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली असून मुलींना फूस लावून पळवून नेवून त्यांची परराज्यात परस्पर विक्री करीत असल्याची टोळी सक्रीय असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मागील तीन महिन्यात केवळ वणी पोलिस स्टेशन हद्दीतील सुमारे ४५ मुली बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.
वणी ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या असंख्य मुली शहरात वास्तव्य करीत आहे. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक मुलींना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.अश्या आर्थिकतेच्या विवंचनेत असलेल्या मुलींना सहजरित्या टिपल्या जात आहे. तिला आर्थिकतेचे आमिष दाखवून ही टोळी मुलींना पळवून नेण्यात माहिर आहे.
मागील तीन महिन्यात वणी विभागातील वणी,शिरपूर, पाटण, मुकुटबन, व मारेगाव या पाचही पोलिस स्टेशन मधून जवळपास १२० जन बेपत्ता असल्याची माहिती आहे. यातील केवळ वणी पोलिस स्टेशन मधून जवळपास ४५ मुलींची संख्या आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या बाबीकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
मागील काही महिन्यापासून वणी परिसरातील वयोवर्ष १६ ते २४ च्या दरम्यान वयात आलेल्या अविवाहित मुलीना फूस लावल्या जात आहे. त्याच बरोबर त्यांना आर्थिकतेचे आमिष दाखवण्या जात आहे. बेपत्ता होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होताना निदर्शनास येत आहे. तरी पालकांनी आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे.