Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeNewsनवरात्रोत्सवात वणीमध्ये प्रज्वलित होणार कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत भाविक भक्तांनी अखंड...

नवरात्रोत्सवात वणीमध्ये प्रज्वलित होणार कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत भाविक भक्तांनी अखंड ज्योतीचे दर्शन घ्यावे : अध्यक्ष रवि बेलुरकर यांचे आवाहन

News Today 
वणी : नवरात्रोत्सवानिमित्त वणी शहरातील आंबेडकर चौक येथील प्रसिद्ध नवशक्ती दुर्गामाता मंदिर समितीच्या वतीने यावर्षी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत वणीमध्ये आणण्यात येणार आहे. दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी या अखंड ज्योतीची दुर्गामाता मंदिरात विधिवत स्थापना करण्यात येणार असून, भाविकांना दर्शनासाठी ती उपलब्ध राहणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी दिली.
नवशक्ती दुर्गामाता मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी एका शक्तिपीठातून मातेची अखंड ज्योत वणीमध्ये आणण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्या वर्षी माहूर येथील रेणुका मातेची, दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेची आणि तिसऱ्या वर्षी हरियाणा, कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत वणीमध्ये आणण्यात आली होती. यावर्षी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत आणण्यात येणार आहे.
१० ऑक्टोबरला वणीहून ज्योतयात्रा
श्री महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत आणण्यासाठी दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी वणीहून ज्योतयात्रा कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. दि. ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे पोहोचल्यानंतर श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन विधिवत ज्योत प्रज्वलित करण्यात येईल. त्यानंतर दि. १२ ऑक्टोबर रोजी ही अखंड ज्योत वणी येथे आणून दुर्गामाता मंदिरात विधिवत स्थापना करण्यात येणार आहे.
या ज्योतयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वखर्चाने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केले असून, इच्छुक भाविकांनी मंदिर समितीशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामाता मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योतयात्रेत मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्यासह शिवराम आसुटकर, नितीन बिहारी, अमोल बदखल आणि राजू शिरभाते सहभागी होणार आहेत.
वणी शहर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मातेच्या अखंड ज्योतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हे आवाहन अध्यक्ष रवि बेलुरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदाडे, अमोल बदखल, स्वप्नील बिहारी, राजकुमार अमरवानी, नितीन मसेवार, धम्मा मनवर, अशोक मांदाडे, संजय लोणारे, अविनाश कामटकर, विनोद मुथा, चंद्रकांत फेरवानी, राजू जयस्वाल, समीर लाभसेटवार, मनु महाराज तुगनायत आणि अशोकजी बतरा यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter