News Today
अड्याळ टेकडी, दि. ११ ऑगस्ट २०२६ : भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे सुरू करण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर भक्त निवास बांधकामाच्या प्रयत्नाविरोधात तसेच मा. तहसीलदार, ब्रह्मपुरी यांनी दि. २८ जुलै २०२६ रोजी भू वैकुंठ अड्याळ टेकडीच्या मालकीसंदर्भात दिलेल्या अहवालाविरोधात दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता जाहीर भजन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रमुख मार्गदर्शक व संचालक श्री. सुबोधदादा, पोलिस समन्वय समितीचे प्रधान अध्यक्ष प्रवीणजी राऊत, डॉ. नवलाजी मुळे, रेखाताई, लक्ष्मीताई गुरुणुले, दिलीप मेश्राम, जोसेस वाढई, योगेश पडोळे, गंगाताई काकडे, डॉ. प्रमोद माळवे, बबनराव अन्मुलवार, रोडे काकू, रमेश गवळी, भाऊराव बावणे, बाबुराव ठवरे, दिनकर सहारे आदींसह विविध गावांतील भू वैकुंठ अड्याळ टेकडीप्रेमी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालकी व ताब्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित
भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथील गट क्र. २० व २१ या जमिनींच्या नोंदींमध्ये अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम अड्याळ तसेच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम मोझरी अशा नोंदी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दोन्ही गटांच्या नमुना १२ मध्ये पू. तुकारामदादा गीताचार्य यांच्या भू वैकुंठ समिती, अड्याळ टेकडी यांची नोंद असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सन १९६७ पासून आजपर्यंत या जमिनीवर भू वैकुंठ समितीची अखंडित ताबा-वहिवाट आहे. सदर ताबा-वहिवाटीबाबत दिवाणी न्यायालय, ब्रह्मपुरी, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायालयीन कार्यवाही व आदेशांमध्येही उल्लेख असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
मालकी हक्कासंदर्भातील वाद भू वैकुंठ समिती, अड्याळ टेकडी विरुद्ध अखिल भारतीय संस्था, गुरुकुंज मोझरी असा न्यायालयात प्रलंबित असताना, महसूल अधिकाऱ्यांनी मालकी हक्काबाबत अंतिम स्वरूपाचा निष्कर्ष काढणे योग्य आहे का, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
तहसीलदारांच्या अहवालाला विरोध
न्यायालयीन वाद प्रलंबित असतानाही मा. तहसीलदार, ब्रह्मपुरी यांनी दि. २८ जुलै २०२६ रोजी सदर जमिनीच्या मालकीसंदर्भात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी यांची मालकी असल्याचे दिसून येते, अशा स्वरूपाचा अहवाल दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मूळ ताबेदार व वहिवाटदार म्हणून भू वैकुंठ समितीला विश्वासात न घेता असा अहवाल देण्यात आल्याने त्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सदर अहवालाची कायदेशीरता व अधिकारक्षेत्र याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
भक्त निवास बांधकामालाही विरोध
दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे मूळ ताबेदार व वहिवाटदारांना विश्वासात न घेता अचानक भक्त निवास बांधकामाचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. स्थानिक सेवकांनी व भक्तांनी विरोध केल्यानंतर सदर बांधकाम थांबविण्यात आले.
या पार्श्वभूमीवर भक्त निवास बांधकामासंदर्भात देण्यात आलेल्या परवानग्या व मंजुरीचीही सखोल चौकशी करून, जर त्या नियमबाह्य असल्याचे आढळून आले तर त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
१५ दिवसांची मुदत; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
जाहीर भजन सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, येत्या १५ दिवसांच्या आत भू वैकुंठ अड्याळ टेकडीवरील कथित बेकायदेशीर भक्त निवास बांधकामासंदर्भातील मंजुरी रद्द करावी तसेच मा. तहसीलदार, ब्रह्मपुरी यांचा दि. २८ जुलै २०२६ रोजीचा मालकीसंदर्भातील अहवाल तात्काळ रद्द करावा.
अन्यथा विविध गावांतील हजारो गुरुदेव भक्तांना एकत्र करून अधिक तीव्र व व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा ठराव उपस्थित सेवक व भक्तांनी भजन सत्याग्रहादरम्यान एकमताने केला.
“भू वैकुंठ अड्याळ टेकडीच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी हा लढा शांततामय, लोकशाही व कायदेशीर मार्गाने सुरूच राहील,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


