

News Today
वणी | प्रतिनिधी
येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय समीकरणे धक्कादायक रीतीने बदलत असून, शिंदे गटाच्या आक्रमक उतरण्यामुळे भाजपला अनपेक्षित माघार घ्यावी लागली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाविकास आघाडीतून स्वतंत्र वाटचाल करत उमेदवार रिंगणात उतरवल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत चिंतेतही भर पडली आहे. शहरातील संपूर्ण भागात ” एक नर एक नारी, बजाव तुतारी या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चांगलीच उभारी घेतली आहे.

नगरपरिषद वणीची निवडणूक २ डिसेंबर रोजी होत असून, सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला वेग दिला आहे. मात्र, प्रचाराच्या रणधुमाळीत शिंदे गटाने घेतलेली उभारी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विजयबाबू जोडी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने तब्बल २९ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष अशा ३० उमेदवारांची प्रभावी फळी उभी केली आहे.

स्थानिक राजकारणात मोठे मानले जाणारे चोरगे यांच्या खेळीमुळे भाजपची जवळपास अर्धी ताकद शिंदे गटात सामील झाली. यामुळे भाजपची पारंपरिक मतपेढी कमकुवत झाली असून, प्रचारासाठी बाहेरून कार्यकर्ते आणण्याची वेळ पक्षावर आली आहे. भाजपच्या संघटनात्मक अडचणी आणि कमी झालेली स्थानिक पकड त्यांच्यासाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक बनवत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अचानक स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीतील संतुलन ढासळले आहे. राष्ट्रवादीकडून स्वतंत्र नगराध्यक्ष पदासह ११ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जाणारा उमेदवार दिल्याने एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न स्पष्ट दिसून येत आहे.

मात्र, या निर्णयाचा महाविकास आघाडीच्या मतांवर थेट परिणाम दिसू लागला आहे. परंपरागत मतदारांत विभाजन निर्माण झाल्याने आघाडीपुढे नवे समीकरण जुळविण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे.

राजकीय घडामोडींनी रंगलेली वणीची ही निवडणूक आता चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाची आक्रमक खेळी, भाजपची कमकुवत झालेली ताकद आणि राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढतीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता — या तिहेरी संघर्षात नगरपरिषदेचा कौल अखेर कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





