Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedवणी येथील वसंत गंगा विहारमध्ये मुख्य मार्ग बंद; नागरिकांचा संताप, नगरपरिषदेने तात्काळ...

वणी येथील वसंत गंगा विहारमध्ये मुख्य मार्ग बंद; नागरिकांचा संताप, नगरपरिषदेने तात्काळ कारवाई करून मार्ग केला मोकळा

News Today 

वणी – वसंत गंगा विहारचा गेल्या वीस वर्षांपासून नियमित वापरात असलेला मुख्य रस्ता अचानक एका प्लॉटधारकांनी बंद केल्याने शनिवारी सकाळी परिसरात मोठी खळबळ माजली. “हा रस्ता संताजी ज्ञान प्रसारक मंडळाचा प्लॉट आहे, त्यामुळे रस्ता बंद करण्यात येत आहे,” असा मजकूर असलेला मोठा बॅनर लावून रस्त्यावर बांबूचे अडथळे उभे करण्यात आले. या अचानक कारवाईमुळे रहदारी ठप्प झाली आणि नागरिक अक्षरशः अडकल्यागत झाले.

गेल्या दोन दशकांपासून हा मार्ग वसंत गंगा विहार परिसरातील शेकडो नागरिकांचा मुख्य दळणवळण मार्ग म्हणून वापरात आहे. अशा स्थितीत रस्ता खाजगी प्लॉट असल्याचा दावा अचानक कसा जन्माला आला, याबद्दल परिसरात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्ता बंद केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणाची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे पाटील यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. अधिकाऱ्यांच्या पथकाने बंदिस्त केलेला मार्ग तात्काळ खुला करून लावलेला बॅनर तसेच रस्ता रोखण्यासाठी बसवलेले बांबू काढून ते जप्त केले. नगरपरिषदेकडून अशी तातडीची कारवाई होताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

रस्ता बंद करणाऱ्या व्यक्तींनी अचानक असा निर्णय का घेतला, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. “जर हा रस्ता खाजगी प्लॉटचा असेल, तर मग वीस वर्षांपासून तो सार्वजनिक रस्ता म्हणून कसा वापरला गेला?” असा युक्तिवाद नागरिक करत आहेत. अनेकांनी यामागे प्लॉटच्या नोंदीतील संभ्रम, नवीन मोजणीतील बदल किंवा जमीन व्यवहाराशी संबंधित अंतर्गत वाद असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

रस्ता दीर्घकाळ सार्वजनिक वापरात असल्याने कायद्यानुसार तो सार्वजनिक हक्काचा मार्ग मानला जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तो अचानक बंद करण्याचा अधिकार नसल्याचे विधिज्ञ सांगतात. नगरपरिषदेची कारवाई या पार्श्वभूमीवर योग्य आणि आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी असा देखील निर्वाळा दिला की भविष्यात अशा अनधिकृत रस्ता बंदीच्या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने रस्त्यांच्या नोंदी, सीमारेषा व मोजणी याबाबत स्पष्टता निर्माण करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter