Thursday, March 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedमारेगाव तालुक्यात सामूहिक गायगोधन गोपूजा सोहळा 2025 संपन्न

मारेगाव तालुक्यात सामूहिक गायगोधन गोपूजा सोहळा 2025 संपन्न

News Today 
वणी:- अनेक वर्षांची परंपरा असलेला यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील टेकडीवरील माळावर (मोठा देव मंदिर), (वणीवरून पंधरा किलोमीटर तर मारेगाववरून नऊ किलोमीटर अंतर) बलिप्रतिपदेच्या दिवशी बुधवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत गायगोधनाचा सामूहिक सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या गायगोधन सोहळ्यासाठी चिंचाळा, वरुड, आकापूर, नेत, पाथरी, पारधी वस्ती, पिसगाव, पहापळ या गावांतील गुराखी व शेतकरी यांनी आपल्या गावातील सजविलेल्या शेकडो गायींना वाजत गाजत पूजेसाठी आणले. मंदिराचे पुजारी अंकुश गेडाम यांनी मोठा देवाची पूजा व आरती करून सजविलेल्या गायींची मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. या प्रसंगी गुराखी मंडळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वादन, गायन, तसेच गायगोधनाशी संबंधित गाणी व आरत्या सादर केल्या.

 

भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत गायी, पशुधन आणि गुराख्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन 2022 पासून प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे यांच्या संकल्पनेतून गुराखी मंडळींचा सत्कार करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. यावर्षी प्रज्योत भाऊराव खंडरे (चिंचाळा), शंकर गोविंदा नागोसे (वरुड), श्रीराम घोरपडे व वैभव ढवळे (नेत), नंदू पोतू कोरझरे (साले भट्टी), संदीप मरसकोल्हे (गौराळा), आशिष वाढई (आकापूर), बाल गुराखी व वादक विशाल रामभाऊ चाहारे (चिंचाळा), अन्य गुराखी, पोलीस कर्मचारी व वनविभाग कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि राष्ट्रसंतांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. महिला गुराखी, बाल वादक आणि महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आकर्षण ठरली.

यवतमाळ जिल्ह्यात अशा सामूहिक गायगोधन सोहळ्यांचे आयोजन अनेक ठिकाणी होत असले तरी टेकडीवरील माळावरील हा सोहळा उंच परिसरात असल्याने दूरवरूनही स्पष्ट दिसतो. त्यामुळे भाविकांची उपस्थिती दरवर्षी वाढत आहे.

मोठा देव मंदिराची जीर्णावस्था लक्षात घेऊन शासनाकडून जीर्णोद्धाराची अपेक्षा भाविक करत आहेत. तसेच भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलची सोय करण्याची मागणीही होत आहे.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे, शशिकांत तावाडे (उपसरपंच, चिंचाळा ग्रामपंचायत), देवीदास भट (उपसरपंच, वरुड ग्रामपंचायत), चंद्रकांत ढोबे (उपसरपंच, गौराळा ग्रामपंचायत), संदीप कारेकर (सरपंच, आकापूर-नेत ग्रामपंचायत) आणि दिवाकर रिंगोले यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमस्थळी मद्यपान करून येणे, मद्यपान करणे आणि फटाके फोडणे यावर सक्त मनाई होती. आमदार संजय देरकर (वणी विधानसभा मतदारसंघ), जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (वणी), पोलीस निरीक्षक (मारेगाव) आणि वनविभाग (मारेगाव) यांच्या सहकार्याने ठेवलेल्या कडक बंदोबस्तामुळे हा सोहळा अत्यंत शांततेत पार पडला. उपस्थित भाविक समाधानी होते.

एक काळी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या सोहळ्याला उर्जितावस्था आणण्यासाठी 2022 पासून प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे, शशिकांत तावाडे, देवीदास भट, चंद्रकांत ढोबे, संदीप कारेकर आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter