News Today
वणी :- चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर यांच्या वतीने छोरीया ले-आउट येथील जेष्ठ नागरिक भवनात आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उदयराव गोहोकार (अध्यक्ष, चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ, गणेशपूर) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून विजयराव थेरे (सेवानिवृत्त विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी) तसेच सौ. निलीमाताई काळे (अध्यक्ष, महिला समिती) उपस्थित होते.

यावेळी नामदेवराव शेलवडे (माजी सैनिक व कार्यकारी संचालक, बालाजी महाराज वृद्धाश्रम) व अतीजेष्ठ नागरिक सौ. विमलताई डाहुले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पश्चिम विदर्भ प्रादेशिक जेष्ठ नागरिक मंडळाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल चैतन्य मंडळाला मिळालेल्या कार्यगौरव पुरस्काराबद्दल कार्यकारिणी मंडळाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक विजयराव गंधेवार यांनी अवयवदान व देहदान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून “मरावे परी अवयवदान व देहदान रूपी उरावे” या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. विजयराव थेरे यांनी हा विषय शालेय शिक्षणात समाविष्ट करून व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे नमूद केले. तर उदयराव गोहोकार यांनी अवयवदान केलेल्या जेष्ठ नागरिकांची उदाहरणे देत अधिकाधिक सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविकातून लक्ष्मण इद्दे यांनी जेष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच अतीवृष्टी व महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फेस्काम मार्फत मदत करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाजी विधाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष आत्राम यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला वणी परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्करराव खारकर, गुलाब निते व सौ. लिचोडे मॅडम यांनी सहकार्य केले.



