
News Today
तालुका प्रतिनिधी : मंगेश गोरे
कायर (ता. वणी) – तेजापूर AG लाईनवरील उपासे डीपी ते पिंपळकर यांच्या शेतापर्यंत टाकलेली वीज वाहिन्यांची संपूर्ण तार चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात चोरी केली. ही घटना 7 जून 2025 च्या रात्री घडल्याचे उघड झाले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे शेतात घुसून खांबांवरील वायर कापून पळून गेले. त्यामुळे संबंधित भागातील शेतीसाठी वापरली जाणारी वीज पूर्णपणे खंडित झाली आहे. मोटारी बंद पडल्याने पिकांना पाणी मिळेनासे झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

घटनेनंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, चोरट्यांना तात्काळ पकडून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, तेजापूर AG लाईनचे लाइनमन लेडांगे व त्यांची टीम या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शंका व्यक्त केली जात आहे की, या चोरीमध्ये स्थानिक कर्मचारीच सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाइनमनकडे याबाबत विचारणा केली असता, “ही लाईन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नव्हता,” असे उत्तर देत त्यांनी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी संपूर्ण शेतकरी वर्गाकडून होत आहे.



